Home >> Magazine >> Rasik
Change Magazine
 

Go to Page << Previous123456Next >>

 
Epaper
 
 
वर्धापनदिन विशेष   आशय गुणे  विचारांची पक्की बैठक असलेले, चिकित्सक विचारांची कास धरू पाहणारे वाचक बाजारपेठीय व्यवस्थेचे मुख्य शत्रू असतात. त्यामुळे बव्हंशी प्रकाशक-संपादक स्थितीवादी, मोहाला बळी पडू पाहणाऱ्या वाचकांच्या शोधात असतात. या वाचकांना आकर्षित करणाऱ्या योजना धडाक्यात राबवत असतात. या वाचकांचे निव्वळ रंजन करण्याचा, त्यांच्या धार्मिक श्रद्धा गोंजारण्याचा प्रयत्न करत असतात. एकदा का हा वाचक जाळ्यात आला की, जाहिरातदारांचे काम सोपे होऊन जाते आणि मग आपला ‘कन्झ्युमरिस्ट अॅप्रोच त्यांना विनाअडथळा अंगीकारता येतो. साहजिकच विचारांशी बांधिलकी असलेल्या वाचकांकडे हा जाहिरातदार फिरकतसुद्धा नाही. कारण हा आपला ‘कस्टमर नाही, तो आपले उत्पादन सहजासहजी विकत घेणार नाही, याची त्याला पुरेपूर खात्री असते. या स्थितीतून उद‌्भवणारे परिणाम आपल्या वैचारिकतेला आव्हान देणाऱ्या प्रवाहाबाहेरच्या नियतकालिकांच्या आणि बाजारू व्यवस्थेला प्रमाणाबाहेर जागा देणाऱ्या मुख्य प्रवाहातल्या माध्यमांच्या टोकाच्या यशापयशातून जाणवत राहतात. अलीकडे मुख्य प्रवाहातली प्रसारमाध्यमे वृत्तपत्र वा मासिकांकडे ‘प्रॉडक्ट या नजरेनेच पाहतात. मात्र, यात हे प्रॉडक्ट कसे असावे, याचा चॉइस प्रकाशकांकडे असतो, अमर्याद नियंत्रण असलेल्या बाजारव्यवस्थेकडे असतो. हे प्रॉडक्ट विकत घेणाऱ्या वाचकांची ‘नो चॉइस अशी अवस्था असते. विचारांशी बांधिलकी जपायची तर आर्थिक दुरवस्था सहन करा आणि वैचारिक भूमिका सोडायची तयारी असेल तर आर्थिक स्थैर्य अनुभवा, असा विचित्र पेच ही व्यवस्था विचारविश्वापुढे हरघडी टाकत राहते. अशा वेळी, विचार महत्त्वाचा की माध्यम महत्त्वाचं? समाज विचारांनी घडतो की माध्यमे समाजाला घडवतात? असे प्रश्न उपस्थित होतात. विसाव्या शतकातले माध्यम तत्त्वज्ञ मार्शल मॅक्लुहान यांनी सिद्धांताद्वारे या प्रश्नाचे दिलेले उत्तर असते, ‘‘माध्यमांद्वारे प्रसृत होणाऱ्या आशयापेक्षाही त्या-त्या काळातले माध्यमांचे स्वरूपच चांगल्या-वाईट अर्थाने समाज आणि संस्कृती घडवत असतात. याचाच दुसरा अर्थ, त्या माध्यमांचे वापरकर्ते समाजाला बरी-वाईट दिशा देत असतात. याच कालातीत वास्तवाचे भान राखत ‘दिव्य मराठी आणि रविवार ‘रसिकची गेल्या चार वर्षांची वाटचाल झालेली आहे. हेच भान जपत आम्ही हा वर्धापनदिन विशेषांक प्रकाशित करत आहोत. पॉझिटिव्ह, ऑफबीट आणि कर्तृत्ववान युवा पिढीची ‘मन की बात सांगणारा असा हा अंक आपल्याला भावेल. वाचकांचा यथायोग्य सन्मान करण्याचा आमचा हा प्रयत्न आपल्या कायमस्वरूपी स्मरणातही राहील, या आशेसह सर्व ‘रसिकच्या वाचकांना वर्धापनदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!   धन्यवाद.   -संपादक